(अहमदाबाद)
मोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या भेदक मा-यापुढे मुंबईच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. मोहित शर्माच्या पाच विकेटच्या बळावर गुजरातने मुंबईचा ६२ धावांनी पराभव केला. गुजरातने दिलेल्या २३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ १८.२ षटकात १७१ धावांवर गारद झाला. २८ मे रोजी गुजरात आणि चेन्नई यांच्यात फायनलचा थरार रंगणार आहे. मुंबईकडून एकट्या सूर्यकुमार यादवने झुंज दिली. मोहित शर्माने मुंबईचा अर्धा संघ तंबूत पाठवला तर प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने शतकी खेळी केली.
आयपीएल 2023 मधील शुभमन गिलचे हे तिसरे शतक होते. गिलने या मोसमाच्या सुरुवातीला साखळी फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली होती. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर गिलने षटकारांचा पाऊस पाडला. आकाश मढवालच्या एका षटकात गिलने ३ षटकार ठोकले. त्यानंतर १३व्या षटकात त्याने पियुष चावलालाही दोन षटकार आणि एक चौकार लगावला. गिलची झंझावाती फलंदाजी सुरूच राहिली आणि त्याने कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर सिंगल घेत शतक पूर्ण केले. गिलने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, ज्यात ८ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. गिलने सामन्यात ६० चेंडूत १२९ धावा केल्या. त्याने १० षटकार आणि ७ चौकार मारले. गुजरातच्या विजयाचा हिरो ठरला तो शुभमन गिल, त्याने १२९ धावांची संस्मरणीय खेळी खेळली.
आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज दिली. सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. या खेळीत सुर्याने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. सूर्यकुमार यादवने झंझावाती फलंदाजी करत मुंबईच्या विजयासाठी सर्वस्वी प्रयत्न केले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी २२ चेंडूत ५१ धावांची भागिदारी केली तर सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन यांनी ३२ चेंडूत ५१ धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार यादव आणि विनोद यांच्यामध्ये १९ चेंडूत ३१ धावांची भागिदारी केली.
२३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्मा आणि नेहाल वढेरा इम्पॅक्ट पाडण्यात अपयशी ठरले. नेहाल वढेरा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता. पण फक्त चार धावांवर शमीने त्याला तंबूत धाडले. कर्णधार रोहित शर्माही मोठी खेळी करण्यात फेल गेला. रोहित शर्मा आठ धावांवर तंबूत परतला. मोहम्मद शमी याने मुंबईच्या सलामी जोडीला तंबूत धाडले.
मुंबईच्या फलंदाजांनी हराकिरी केली. कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. त्याशिवाय नेहल वढेरा, टीम डेविड आणि विष्णू विनोदही फ्लॉप गेले. कॅमरुन ग्रीनला चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा ८, नेहल वढेरा ४, कॅमरुन ग्रीन ३०, विष्णू विनोद ५, टीम डेविड २, ख्रिस जॉर्डन २ धावांवर तंबूत परतले. पीयूष चावलाला खातेही उघडता आले नाही.
दोन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने एका बाजूला दमदार फलंदाजी केली. दुस-या बाजूला कॅमरुन ग्रीन आणि तिलक वर्मा यांनी वादळी फलंदाजी केली. तिलक वर्माने १४ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. कॅमरुन ग्रीनने २० चेंडूत ३० धावांची खेळी केली.
मोहित शर्माच्या भेदक मा-यापुढे मुंबईच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मोहित शर्माने २.२ षटकात १० धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि राशिदखान यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या तर जोस लिटिल याला एक विकेट मिळाली.