राज्यातील वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिविर इंजकेश्नसह लस तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्र शासनाकडे आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तर, केंद्र सरकारकडून देखील महाराष्ट्रासाठी शक्य त्या सर्वप्रकारे मदत केली जात असल्याचे दिसून येत आहे. आता महाराष्ट्र शासनाने केलेल्या विनंतीनुसार केंद्र सरकारकडून मुंबईत जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
“महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
तसेच, “या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड येथे उपलब्ध होऊन करोनाबाधितांवर उपचार होऊ शकतील.” असं फडणवीस म्हणाले आहेत.
याचबरोबर “बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची सुद्धा तयारी दर्शविली आहे. यामुळे सुद्धा मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळेल.” अशी देखील फडणवीस यांनी माहिती दिली आहे.