(मुंबई)
मी काँग्रेस पक्षात जाणार या अफवा आहेत असे सांगत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कोणतीही ठोस भूमिका न घेता परिस्थितीचा अंदाज घेत ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली. माझ्या मनात विषाद, दु:ख आहे, म्हणत सध्या सुरू असलेल्या राजकारणाला कंटाळून राजकारणातून दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर त्यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना विराम दिला. राहुल किंवा सोनिया गांधींना आपण प्रत्यक्ष कधीच पाहिले नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य मानूनही आपल्याविरोधात बातम्या पेरल्या जातात. चारित्र्यहनन करणार्या वाहिनीविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा फुटेल असा दिवस येऊ नये, असे सूचक विधानही त्यांनी सध्याच्या घडामोडींबद्दल बोलताना केले. माझ्या मनात विषाद, दु:ख आहे, म्हणत सध्या सुरू असलेल्या राजकारणाला कंटाळून राजकारणातून दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याची घोषणा केली. पाठीत खंजीर खुपसणे माझ्या रक्तात नाही, असे विधान करत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मात्र कौतुक केले.
त्या म्हणाल्या,‘2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते. तेव्हा माझा पराभव झाला. त्यानंतर अनेक घटना घडल्या. अनेक निर्णय झाले. त्यात मी सामील नव्हते. त्यामुळे मी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पण अनेक कार्यक्रमांमध्ये मी माझी भूमिका स्पष्ट मांडली आहे. गेले काही दिवस अनेक पक्षांनी भाष्य केले की, पंकजा मुंडे आल्या तर स्वागत आहे. याही गोष्टींकडे मी फार गांभीर्याने घेतले नाही, त्यावर भाष्य केले नाही. पण परवाच्या दिवशी अशी बातमी आली की, मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधींची भेट घेतली आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे. माझे करिअर कवडीमोलाचे नाही. मी 20 वर्षे पक्षाचे काम करते. माझ्यावर वडिलांचे संस्कार आहेत. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसण्याचा माझा स्वभाव नाही. पण या चर्चा का होतात? कारण प्रत्येक वेळी माझ्या नावाचा पदाबाबत विचार होतो आणि नंतर मी तिथे येत नाही. विधानपरिषदेच्या अनेक जागांवर इतरांची नियुक्ती झाली. भागवत कराड विधानपरिषदेवर गेले. त्यांच्या रॅलीला मीच झेंडा दाखवला होता. विधानपरिषदेसाठी मला आधी फॉर्म भरा म्हणाले. 10 मिनिटे आधी म्हणाले नका भरू. पक्षाचा प्रत्येक आदेश मी शिरसावंद्य मानला आहे. मी नाराजी व्यक्त केली नाही. पण माझ्या भाषणाचे तुकडे काढून जोडले जातात. मी पक्षाविरोधात असे काय केले की, माझ्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले? कोणी माहिती दिली या वाहिनीला? मला जर काही करायचे तर ते ‘डंके की चोटपर’ करेन. मला अनेक लोक विचारत आहेत की, ताई तुम्ही काय करणार आहात? अनेक लोक सल्ले देत आहेत.’
पंकजा यांनी पुढे पक्षाविषयी सांगितले की, ‘पं. दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. माझ्या वडिलांच्या राजकारणाचा प्रभाव माझ्यावर आहे. अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. कोणावर टीका करणे, वैयक्तिक बोलणे माझ्या स्वभावात नाही. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा संसदेच्या पायरीवर डोके ठेवले, तेव्हा अनेक तरुणांच्या मनात स्वप्ने जागली. अनेक तरुण राजकारणात आले. मी जाहीर करते की, मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी मी कधीही पक्षप्रवेशाविषयी बोललेले नाही. मी राहुल गांधी किंवा सोनिया गांधींना कधीही प्रत्यक्ष भेटलेही नाही. मी नाराज नाही, पण दु:खी आहे. राजकारणात बदल होत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, पवारांची राष्ट्रवादी राहिली नाही. तसे पं. दीनदयाळ उपाध्याय आणि वाजपेयींचा भाजप संपू नये यासाठी मी आणि माझ्यासारखे लहान लहान कार्यकर्ते काम करतील. माझा प्रवास स्पष्ट आणि पारदर्शक आहे.’
राज्यातल्या सामाजिक, राजकीय स्थितीविषयी भूमिका मांडताना पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्या म्हणाल्या, ‘जगाला आता लपूनछपून काम करणार्यांचा कंटाळा आला आहे. सर्व गोष्टी सत्ता, मंत्रिपदावर, पक्ष संपवण्यावर सिमित आहेत. लोकांचे काय? तरुणांच्या स्वप्नांचे, महिला अत्याचारांचे काय, संस्थांचे काय सुरू आहे. यावर चर्चा नाही. एखाद्या मुलाने ड्रग्ज घेतले आणि त्याला पकडला, पण तो सुपरस्टारचा मुलगा म्हणून चर्चा होते. पण देशात इतक्या सहजपणे ड्रग्ज का मिळतात, हे यंत्रणेचे अपयश आहे, त्यावर चर्चा नाही. एखाद्या मुलीवर अत्याचार होतो, तेव्हा ती कोणत्या जातीची, अत्याचार करणारा कोणत्या जातीचा यावर चर्चा होते. पण ती सुरक्षित नाही, हे यंत्रणेचे अपयश नाही का? एखाद्या घटनेची माहिती एखाद्या पदावर विराजमान व्यक्तीकडे आहे, पण तो ती देत नाही. टप्प्याटप्प्याने देऊन त्याचा राजकीय उपयोग केला जातो. त्यापेक्षा त्या माहितीचा न्यायाने उपयोग केला पाहिजे अशी भूमिका माझी आहे. या भूमिकेची प्रतारणा करणार्या भूमिका आजुबाजूला आहेत. त्यामुळे मी प्रचंड गोंधळलेली आहे. मला अंतर्मुख होण्याची गरज आहे. विचार करण्याची आवश्यकता आहे. मी 20 वर्षे सुट्टी घेतलेली नाही. मला ब्रेकची आवश्यकता आहे.
मी आमदार झाल्यावर माझ्या पहिल्या मुलाखतीत मी सांगितले होते की, मला जेव्हा जेव्हा माझ्या विचारधारेशी प्रतारणा करावी लागेल, तेव्हा मी राजकारणातून एक्झिट घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही. आताच्या परिस्थितीत मला ब्रेक घेण्याची आवश्यकता आहे. दोन महिने मी सुट्टी घेऊन विचार करणार आहे. जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे आणि त्याच वाटेवर मी आहे का, हे पाहणार आहे. मी हताश नाही, पण या सर्व चर्चांमुळे माझ्या मनात विषाद, दु:ख आहे. राष्ट्रवादी बरोबर आल्याने सर्वांना रूचेल, पटेल आणि आवडेल, असे आम्ही समजत नाही. या सर्व परिस्थितीतून संवाद साधत मार्ग काढू असे त्या यावेळी म्हणाल्या.