(नवी दिल्ली)
‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक फरार अमृतपाल सिंगने नवा व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये अमृतपाल स्वत:ला फरार नाही तर बंडखोर असल्याचे सांगत आहे. एवढंच नाहीतर आपण लवकरच समोर येणार आहे असंही तो म्हणाला आहे. याशिवाय त्याने पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिले आहे, सरकारला मी घाबरत नाही, तुम्हाला जे करायचे ते करू शकता, असे म्हटले आहे.
अमृतपाल सिंगने धमकीवजा शब्दात म्हटले आहे की, ज्याना माझ्याशी लढायचे असेल ते लढू शकतात, मी घाबरत नाही. नवीन व्हिडीओमध्ये अमृतपाल सिंगने आपल्या कुटुंबियांनाही मजबूत राहण्यास सांगितले आहे. आपण ज्या वाटेवरून चालत आहोत तो काट्याने भरलेला असल्याचे त्याने म्हटले आहे. अमृतपालने पुन्हा एकदा अकाल तख्तच्या जथेदारांना सरबत खालसा बोलावण्याचे आवाहन केले आहे.
तो पुढे म्हणाला, ‘’मी जो व्हिडिओ रिलीज करत आहे. कदाचित माझा व्हिडीओ पोलीस कोठडीत बनवल्याचा लोकांना संशय असेल.’’ या व्हिडीओमधून अमृतपालने पुन्हा एकदा तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. समाजासाठी आणि तरुणांसाठी काहीतरी करू शकलो याचा आनंद असल्याचं तो व्हिडिओमध्ये सांगत आहे.