(नाशिक)
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तीन तरुणांच्या टवाळखोरीला वैतागून एका दहावीतील विद्यार्थिनीने आपल्या आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे सिन्नरसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गावातील तीन तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीनही संशयितांना ताब्यात घेतले आहे. मृत तरुणीचे नाव वैष्णवी नवनाथ जाधव असे आहे.
वैष्णवी ही भैरवनाथ हायस्कूलध्ये दहावीत शिकत होती. दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात टवाळखोरी करत मुलींना त्रास देणार्या गावातील तिघांसोबत तिचा वाद झाला होता. या तिघांनी तिच्या घरी जाऊन तिला व तिच्या वडिलांना दमदाटी केली होती. तसेच तिच्या वडिलांना धमकावत वैष्णवी तुला जगण्याचा अधिकार नाही. तू जीव दे नाहीतर आम्ही तुझा जीव घेतो, अशी धमकी दिली. यामुळे वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलत मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. आत्महत्येपूर्वी तिने एक सुसाईड नोटादेखील लिहिली होती.
पोलिसांना वैष्णवीच्या खोलीत वहीच्या कागदावर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात तिने गावातीलच वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसुंदर व आणखी एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा उल्लेख करत हे तिघेजण आपल्याला नेहमीच त्रास देत होते. माझ्यासह शाळेतील अनेक मुलींना त्यांनी त्रास दिला आहे. मी विरोध केला म्हणून त्यांनी घरी येवून वडिलांना माझ्याबद्दल वाईट साईट सांगितले. शिवीगाळ करून धक्काबुक्की देखील केली. ते तिघेही वाईट प्रवृत्तीचे असून पुन्हा त्रास देतील व पुन्हा काही झाल्यास घरी वडील मारतील या भीतीने मी आत्महत्या करत आहे असे लिहिले.