गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्यामुळे त्याला सर्वस्वी डॉक्टर जबाबदार असल्याचे नमूद करून गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी त्या महिला डॉक्टरच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महिला डॉक्टरने तिच्यावरील आरोपांचा विरोध करत स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे.
संबंधित घटना ही राजस्थान मधील दौसा जिल्ह्यात घडली आहे. गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मृत महिलेच्या कुटूंबियांनी महिला डॉक्टर विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महिला डॉक्टरने एक सुसाईड नोट लिहून आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना नकार देत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव अर्चना शर्मा आहे. तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, ‘ मी कोणतीही चूक केली नाही. मी कोणालाही मारलेलं नाही. पीपीएच एक गुंतागुंत आहे. त्यासाठी डॉक्टरांना त्रास देणं बंद करा. शेवटी तिनं माझ्या मुलाला आईची उणीव जाणवू देऊ नका.’ असे लिहिले आहे.
अर्चना शर्मा यांचे पती डॉ. सुनित उपाध्याय देखील त्याच रुग्णालयात असून, त्यांच्यावर देखील यासंदर्भात मृत गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला होता. यामुळे डॉक्टर अर्चना यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. त्यांनी मंगळवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना अर्चना शर्माच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यानंतर, मृत अर्चना यांचे पती डॉ. सुनित यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला म्ह्णून अर्चना यांनी आत्महत्या केली आहे
सुनित यांनी पोलिसात एफआयआर नोंदवला आहे. अर्चना यांच्या आत्महत्येनंतर खाजगी रुग्णालयांच्या संघटनेनं स्थानिक दौसामधील सर्व खाजगी रुग्णालयं एका दिवस बंद ठेवली होती. दरम्यान, मृत गर्भवती कुटूंबीयांनी दाखल केलेल्या एफआयआरचा देखील तपास पोलीस करत आहेत.