(मुंबई)
भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवून तिच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित महिलेच्या पतीनेच चारित्र्याच्या संशयावरुन तिची हत्या केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह तिच्या दिरालाही अटक केली आहे. हातावर असलेल्या टॅटूमुळं पोलिसांना आरोपीचा माग काढणे सोपे पडले.
अंजली सिंह (वय, २३) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून ती नालासोपारा येथील रहिवाशी आहे. अंजलीचे तीन वर्षांपूर्वी मिट्टू सिंह याच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंजली ही खुल्या स्वभावाची होती आणि ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असायची. यामुळे मिट्टू सिंहला तिच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला होता. यामुळे त्यांच्यात सतत भाडंण होत असे. दरम्यान, २४ मे २०२३ रोजी मिट्टू आणि अंजली यांच्यात पुन्हा वाद झाला. याच वादातून मिट्टूने अंजलीची हत्या करुन शीर कापले. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच आपल्या गुन्ह्यांवर पांघरुण टाकण्यासाठी अंजलीच्या धडाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले. यानंतर सुटकेस भाईंदर समुद्र किनाऱ्यावर नेऊन फेकले.
या हत्येत मिट्टूचा भाऊ चुनचुन सिंहनही त्याची मदत केली. अंजलीचा मृतदेह फेकल्यानंतर मिट्टूने त्याच्या मुलाला सासरच्या ताब्यात दिला. त्यानंतर अंजलीचे नालासोपाऱ्यात असलेले दागिने घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला दादर रेल्वे स्थानकावरुन अटक केली.