2015 मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वे देशाचे प्रतिनिधित्व केलेली स्पर्धक शेरिका डी अरमासचे वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी निधन झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शेरिका डी अरमास गेल्या काही दिवसांपासून गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. शेरिकाने केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचार देखील घेतले होते. पण 13 ऑक्टोबर रोजी तिची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
शेरिका डी अरमासच्या निधनामुळे तिच्या जगभरातील चाहत्यांमध्ये आणि उरुग्वे देशाच्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. शेरिकाच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
मिस युनिव्हर्स उरुग्वे 2022 कार्ला रोमेरोने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लिहिले आहे की, मी आजपर्यंत भेटलेल्या सर्वात सुंदर महिलांपैकी ती एक होती. तर, तू नेहमी माझ्या आठवणीत राहशील. केवळ तू मला दिलेल्या पाठिंब्यामुळेच नाही तर तुझ्या स्नेहामुळे, तुझा आनंदामुळे, आपल्यात असणाऱ्या मैत्रीमुळे तू माझ्या आठवणीत राहशील, असे मिस उरुग्वे 2021 लोला डे लॉस सॅंटोसने पोस्ट शेअर करत आपले दुःख व्यक्त केले आहे.