(रत्नागिरी)
नुकत्याच झालेल्या ‘मिस्टर इंडिया २०२३’ शरीरसौष्ठव स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील फणसोपच्या सुरेश सत्यवान भातडेने सुवर्णपदकाला गवसणी घातली. ‘मिस्टर युनिव्हर्स इंडिया’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्याने रौप्यपदक मिळवले. सलग चार दिवस झालेल्या या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत देश-विदेशातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत आकर्षक पोज देत सुरेशने उपस्थितांची मने जिंकली.
फणसोप येथील सुरेशने २०१३ पासून फिनिक्स हार्डकोअर जिममध्ये जाण्यास सुरवात केली. २०१४ मध्ये ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. मि. युनिव्हर्स महेश भिंगारकर, दिनेश शेळके, सदानंद जोशी, राज नेवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शैलेश जाधव यांच्या फिनिक्स हार्डकोअर जिम व्यायामशाळेत सध्या सहा ते सात तास व्यायामाचा सराव करत असल्याचे सुरेशने सांगितले. शरीरसौष्ठव स्पर्धा आव्हानात्मक असल्याने आणि खर्चिक खेळ आहे. दर महिन्याला डाएट बदलले जात असल्याचे सुरेशने सांगितले.