(मुंबई)
भारत आपला ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून भारताची एकता आणि एकात्मता ही अतूट अशीच आहे. ही एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत, संगीत हा त्याचपैकी एक. भारताच्या एकतेचे अखंड दर्शन घडवणा-या मिले सूर मेरा तुम्हारा या गीताला आता ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तब्बल १४ भाषा आणि अनेक देशभरातल्या कलाकारांच्या सहभागाने तयार झालेल्या या गीताच्या निर्मितीचा किस्सा भन्नाट आहे.
दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय गीताचा मान या गीताला जातो. १५ ऑगस्ट १९८८ रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाल्यानंतर दूरदर्शनने सर्वप्रथम मिले सूर मेरा तुम्हारा… तो सूर बने हमारा हे गीत सादर केले होते. या गीताच्या निर्मितीची कहाणी अतिशय रंजक आहे. १९८८ मध्ये बनलेल्या या गाण्यात अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती आणि जितेंद्र यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता.
सुरेश मलिक आणि जाहिरात चित्रपट निर्माते कैलाश सुरेंद्रनाथ यांची या गाण्याची संकल्पना होती. दिग्दर्शनाची धुरा कैलास सुरेंद्रनाथ यांच्या हाती सोपवण्यात आली होती. देशातील तरुणांना अभिमान वाटेल, असे गीत निर्माण करण्याचे निर्देश या दोघांना देण्यात आले होते. त्यासाठी या दोघांनी अनेकांना पत्रे लिहिली, अनेकांशी ट्रंक कॉलच्या माध्यमातून संपर्क केला. सतत महिनाभर हे दोघे याच गीतावर काम करत होते. अखेर सर्वांशी संपर्क करून या गीताचे रेकॉर्डिंग केले आणि हे गाणे अफलातून ठरले.