(मुंबई)
मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला. रविवारी सकाळी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे देवरा कुटुंबाचे काँग्रेससोबतचे ५६ वर्षांचे नाते संपुष्टात आले. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे मोठे नेते होते. आपल्या वडिलांच्या अनुषंगाने मिलिंद देवरा यांनीही काँग्रेसमध्ये आपली कारकीर्द सुरू केली, परंतु रविवारी त्यांनी संबंध तोडले.
मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत औपचारिकपणे शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेतेही शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले आहेत. मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार राहिले आहेत. यानंतर काँग्रेसच्या काळात ते केंद्रात राज्यमंत्रीही झाले, मात्र त्यानंतरच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत देवरा यांचा पराभव झाला. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत देवरा यांचा पराभव झाला होता. सध्या ही जागा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. आणि जागावाटपादरम्यान उद्धव ठाकरे गट ही जागा सोडायला तयार नाही. त्यामुळेच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
मिलींद देवरांसोबत समर्थकही शिंदे गटात
- सुशिबेन शहा, राज्य महिला आयोग, माजी अध्यक्ष
- प्रमोद मांद्रेकर , माजी नगरसेवक
- सुनिल नरसाळे, माजी नगरसेवक
- रामवचन मुराई , माजी नगरसेवक
- हंसा मारु, माजी नगरसेवक
- अनिता यादव, माजी नगरसेविका
- रमेश यादव
- गजेंद्र लष्करी, माजी नगरसेवक
- प्रकाश राऊत- जनरल सेक्रेटरी मुंबई कॉग्रेस
- सुशिल व्यास , मारवाडी संमेलन अध्यक्ष
- पुनम कनोजिया
- संजय शहा, डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ- अध्यक्ष
- दिलीप साकेरिया – मुंबई काॅग्रेस राजस्थानी सेल- अध्यक्ष
- हेमंत बावधनकर- निवृत्त पोलिस अधिकारी
- राजाराम देशमुख, सचिव- मुंबई कॉग्रेस – विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर
- त्रिंबक तिवारी- सेक्रेटरी, मुंबई कॉग्रेस कमिटी
- कांती मेहता- ऑल इंडीया जैन फेडरेशन अध्यक्ष
- 85 वर्षीय काॅग्रेसचे कार्यकर्ते जवाहरभाई मोतीचंद यांचा शिंदे गटात प्रवेश
दिल्लीत फायनल झाला देवरांचा प्रवेश
दक्षिण मुंबईचे खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश करकरणार असल्याची कानोकान खबर पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना नव्हती. प्रवेश देण्याच्या तासाभरापूर्वी त्यांनी तसे जाहीर बोलून दाखवले होते. अचानक दिल्लीवरून सूत्रे फिरली आणि स्वतः शिंदे यांना देवरा यांच्या हाती भगवा द्यावा लागला. आधी काँग्रेसमध्ये असा प्रकार होत होता, आता भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांमध्ये त्याचाच धडा गिरवला जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी हे सर्व कठपुतली आहेत, अशी टीका केली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई ही आमची जागा असल्याचे आधीच काँग्रेसला सांगितले होते. काँग्रेसने सुद्धा ते मान्य केले होते. पण, देवरा यांना ते मान्य नव्हते. या जागेवर आपलाच अधिकार असल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र, ते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातात का भाजपमध्ये हे निश्चित नव्हते. मुळात राज्यातील भाजप तसेच शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनाही याची कल्पना नव्हती. दिल्लीत याचा फैसला होईपर्यंत स्वतः एकनाथ शिंदे यांनाही याबाबत कल्पना नव्हती.
या जागेसाठी शिंदे यांच्या मनात यशवंत जाधव किंवा त्यांची पत्नी आणि आमदार यामिनी जाधव यांचा विचार सुरू असल्याचे बोलले जात होते. पण, दिल्लीतून त्यांना आदेश येताच शिंदेंना देवरा यांना पक्षात घ्यावे लागले. मुख्य म्हणजे त्यांना आता दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्यावाचून पर्याय सुद्धा उरलेला नाही. देवरा यांचा शिंदे शिवसेनेतील प्रवेश म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप म्हणेल त्याला आणि ठरवेल त्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, याची ही झलक असल्याचे बोलले जात आहे.