[ रत्नागिरी / प्रतिनिधी ]
मिऱ्या-कोल्हापूर-नागपूर या मार्गाचे चौपदरीकर करण्याच्या कामाची निविदा निघाल्यानंतर आता ठेकेदारही निश्चित करण्यात आला आहे. या मार्गावर जी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे झाली आहेत ती काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना पत्र देण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे येत्या काही दिवसांत काढण्यात येणार आहेत.
या कामाची जबाबदारी असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. रत्नागिरीतील चंपक मैदान ते साळवी स्टॉप आणि साळवी स्टॉप ते हातखंबा मार्गावरील जी अतिक्रमणे किंवा अनधिकृत बांधकामे आहेत त्यांना यापूर्वी नोटीसा देण्यात आल्या आहेत. सुमारे दीडशेपेक्षा अधिक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर आता ठेकेदार निश्चित झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे हटवण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे.
या मार्गावर साळवी स्टॉप परिसरात मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे आहेत. त्यापैकी काही लोकप्रतिनिधींची आहेत. ते त्याची भाडीसुद्धा घेत आहेत. तेथे वीजपुरवठा, वातानुकूलित यंत्रणाही आहे. या सर्वांना पुन्हा एक नोटीस देऊन पोलीस बंदोबस्तात ती हटवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
दरम्यान, काही अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे असणाऱ्या जागांनाही नुकसानभरपाई दिली गेली असल्याची चर्चा आहे. या प्रकाराचीही येत्या काळात चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.