( रत्नागिरी / प्रतिनिधी )
गेली २- ३ वर्षे सतत चर्चेत असलेल्या मिर्या- रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या (क्र. 166) चौपदरीकरणाला अखेर सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता वाहन चालक आणि येथील नागरिकांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. रत्नागिरी मिर्या ते साखरपा आंबा घाटापर्यंतच्या रुंदीकरणाला सुरुवात होणार आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी वसंत पंदेरकर यांनी दिली.
मिर्या येथून सुरू होणारे रुंदीकरण 0 ते 8 कि.मी.पर्यंत दुपदरीकरण आणि पुढे 67 कि.मी.पर्यंत चौपदरीकरण आणि आंबा घाटात दुपदरीकरण केले जाणार आहे. रुंदीकरणासाठी ज्या जागा संपादित करण्यात आल्या आहेत, त्यातील घोषित मोबदला 731 कोटी 44 लाख रुपये इतका आहे. प्राधिकरणाला 438 कोटी 20 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 418 कोटी 64 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. ज्यांच्या जागा संपादित करण्यात आल्या आहेत, ते 9 हजार 525 खातेदार असून त्यातील 6 हजार 209 खातेदारांना मोबदला वाटप झाला आहे. प्राप्त निधीपैकी 33 कोटी 99 लाख रुपये शिल्लक असून 293 कोटी 32 लाख रुपये प्राधिकरणाला मिळणे बाकी आहे.
चौपदरीकरणासाठी 140.39 हेक्टर क्षेत्र संपादित करायचे आहे. त्यातील 129.92 हेक्टर क्षेत्र यापूर्वीच संपादित करण्यात आले आहे. 10.47 हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. संपादित केलेल्या संपूर्ण जागेमध्ये 20.10 हेक्टर जमीन शासनाच्या मालकीची आहे. मिर्या – रत्नागिरी – नागपूर चौपदरीकरणासाठी पाच वर्षांपूर्वी भूसंपादन प्रक्रिया झाली. हा मार्ग रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातून जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, दाभोळे खुर्द, ओझरे बुद्रुक, दख्खन, निनावे, साखरपा खुर्द, मुर्शी, कोंडगाव, मेढेतर्फे देवळे, साखरपा या 13 गावांमधील जागा संपादित करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा, नाणीज, कारवांचीवाडी, पानवल, मधलीवाडी, झाडगाव, कुवारबाव, पडवेवाडी, नाचणे या 14 गावांमधील जागा संपादित करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील सर्व गावांचे निवाडे घोषित करण्यात आले आहेत. शिल्लक 10.47 हेक्टर क्षेत्र संपादित करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे.