(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील मे. जे. एस. डब्ल्यु जयगड पोर्टच्या मिरवणे येथे होत असलेल्या नवीन जेटीच्या बांधकामास स्थगिती देण्याबाबत जयगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना सोमवारी (दिनांक 28 ऑगस्ट 2023) रोजी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, जयगड येथिल मे. जे. एस. डब्ल्यु जयगड पोर्टच्या मिरवणे येथील नव्याने जेटीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या जेटीमुळे मच्छीमारी नौकांना समुद्रात ये-जा करण्याबाबत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. आमच्या उदरनिर्वाहावर परिणाम होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच सदरच्या कंपनीकडुन HP गॅसची वाहतुक मोठया प्रमाणावर केली जाते. त्यामुळे भविष्यात गॅस वाहतुकीच्या वाहनाचा अपघात होऊन गॅस गळती होऊन परिसरात जिवीत व वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे.
सदरबाबत दिनांक 28.08.2023 रोजी सकाळी 11 वाजता सर्व संस्थांच्या पदाधिकारी व मासेमारांची सभा झालेली असून सदर सभेत ठरल्याप्रमाणे सदरच्या जेटीचे काम ताबडतोब बंद करण्याबाबत आपल्याकडुन आदेश तातडीने देण्यात यावा. अन्यथा सदर सुरू असलेले काम बंद न झाल्यास नाईलाजाने आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये अशी विनंती वजा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान मिरवणे येथील जयगड पोर्टच्या नव्या जेटीच्या बांधकामाला स्थगिती देण्यासंदर्भात अनेक मच्छीमार संस्थांनी पाठींबा दिलेला आहे. जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात पाठिंबा दिलेल्या सर्व चेअरमन यांच्या सह्यांचे पत्रक देखील आहे. यामध्ये जयगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था लि. (जयगड ता. जि. रत्नागिरी), पडवे मच्छिमार सहकारी संस्था पडवे (ता. गुहागर जि. रत्नागिरी), आरमान मच्छिमार सहकारी संस्था पडवे (ता. गुहागर जि. रत्नागिरी), आदर्श मच्छिमार सहकारी संस्था पडवे (ता. गुहागर जि. रत्नागिरी), हानुमान मच्छिमार सहकारी संस्था नवानगर काताळे (ता. गुहागर जि. रत्नागिरी), खोतबाबा मच्छिमार सहकारी संस्था कुडली (ता. गुहागर जि. रत्नागिरी), साखरी आगर हेदवी गट मच्छिमार सहकारी संस्था साखरी आगर (ता. गुहागर जि. रत्नागिरी), वेळणेश्वर मच्छिमार सहकारी संस्था वेळणेश्वर (ता. गुहागर जि. रत्नागिरी) आदी संस्थांचा समावेश आहे.
या निवेदनाची प्रत उदयजी सामंत (उदयोग मंत्री तथा पालक मंत्री), श्री. भास्कर जाधव (आमदार गुहागर), उपविभागीय अधिकारी रत्नागिरी, तहसिलदार रत्नागिरी, बंदर निरीक्षक मेरीटाईम बोर्ड जयगड, पोलिस निरीक्षक सागरी पोलिस ठाणे जयगड, मे जे. एस डब्ल्यु जयगड पोर्ट यांनाही रवाना करण्यात आली आहे.