( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरातील मिरकरवाडा येथे भरदिवसा फ्लॅट फोडून 8 लाख 30 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना 27 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिष्मा लियाकत मुल्लानी (29, नगर परिषद शाळा 10 मिरकरवाडा, फ्लॅट 53 घरकुल अपार्टमेंट, मांडवीरोड, रत्नागिरी) यांचा मिरकरवाडा येथे फ्लॅट आहे. करिष्मा मुल्लानी या 27 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या दरम्याने घराला कुलुप लावून बाहेर पडल्या. मात्र दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास घरी आल्या. त्यावेळी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरटयाने घरातील बेडरुममधील कपाटाचे ड्रॉव्हर उचकटून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्यास दिसून आले. यामध्ये 90 हजार रुपये किंमतीचे एक जोड हातातील सोन्याचे कंगण, 1 लाख 90 हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे नेकलेस, 60 हजार रुपये किंमतीची एक सोन्याची चेन, 1 लाख 95 हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे मंगळसूत्र, 17 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, 13 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लेडीज ब्रेसलेट, 75 हजार रुपये किंमतीचे एक जोड सोन्याचे कंगण , 95 हजार रुपये किंमतीचे छोटे नेकलेस, 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस सेट व कानातले डुल, 30 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 8 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला. शहर पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.