( मुंबई )
कांदिवली येथील रहिवासी आरोपी विष्णुकांत बलूर (७९) आणि त्यांची पत्नी शकुंतला बलूर (७६) या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. पत्नी शकुंतला बलूर यांना मधुमेह होता तर विष्णुकांत बलूर हे देखील गेल्या चाळीस वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आहेत. आपल्या पत्नीच्या आजारपणाला कंटाळलेल्या या वृद्धाने तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुगर जास्त असताना पत्नी वारंवार मिठाई खायला मागत होती. पत्नीला मधुमेह असतानाही ती सतत मिठाई खायची यामुळे संतापलेल्या वृद्ध पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे.
डॉक्टरांनी कित्येकदा इशारा दिल्यानंतरही पत्नीने मिठाई खाणं सोडलं नाही, यामुळे त्यांची तब्बेत वारंवार बिघडत होती. शकुंतला यांच्या पतीने अनेकवेळा त्यांना मिठाई खाण्यापासून रोखलं होतं. मात्र त्या कोणाचेच ऐकत नव्हत्या. पतीने मिठाई दिली नाही की त्या त्यांच्यासोबत वादही घालत होत्या.
आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, दुपारी शकुंतलाने मिठाई मागितली होती. एकदा मिठाई आणून दिल्यानंतरही तिने आणखी गोड हवं असल्याचा हट्ट धरला. त्यामुळं आरोपीला राग आला. याच रागाच्या भरात त्याने पत्नीवर चाकुने हल्ला केला. इतकंच नव्हे तर, आरोपीने चाकुने स्वतःवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यो जोडप्याचा मुलगा अमेरिकेत राहत असून पोलिसांनी त्याला या घटनेबाबत सूचना दिली आहे.
घरात काम करणारी मोलकरीण जेव्हा बालुर यांच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांनी शकुंतला या बेडवर गंभीर जखमी होऊन पडल्या असल्याचे पहिले. तर, विष्णुकांत त्याच बाजूला एका खुर्चीवर निर्विकार बसले होते. यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.