( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरीतील माहेर संस्थेचा 26 वा वर्धापन दिन नुकताच माहेर बालगृह हातखंबा येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत बालगृहातील प्रवेशितांनी स्वागत गीत म्हणून केले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वधर्मसमभावाचे प्रतीक बायबल, कुरान, गीता तसेच देशाचे सर्वोच्च संविधान यांचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. माहेर संस्थेतील मुला-मुलींनी देशभक्तीपर व सामाजिक संदेश देणारी नृत्य सादर केली व सावित्रीबाई फुले यांना गीतामधून अभिवादन केले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार शाल पुस्तक व मुलांनी बनवलेली कागदी फुले देऊन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांनी सिस्टर लुसी कुरियन यांनी 1997 साली माहेर संस्था सुरू केली. व आज देशातील विविध राज्यात 60 शाखांमधून समाजसेवेचे काम चालू असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या श्रीम.रेवा कदम सामाजिक कार्यकर्ती देवरुख यांनी माहेर संस्थेचे कार्य हे मानवतेचे असून समाजातील गरजू पर्यंत पोहोचत आहे. याचा अभिमान वाटतो असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री. युयुत्सु आर्ते यांनी आपल्या शुभेच्छा पर मनोगतात, पूर्ण कोकणात माहेरसारखे निराधारांसाठी सर्वसमावेशक काम करणारी कोणतीच संस्था नसून माहेर सर्वधर्म समभावाने जे कार्य करीत आहे ते अखंडपणे सुरू राहावे व निराधारांना आधार मिळावा असे प्रतिपादन केले.
रत्नागिरीमध्ये माहेर संस्थेचा नावलौकिक व प्रगती होण्यामागे सुनील कांबळे यांचे कर्तुत्व कारणीभूत असल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हाक मारा संस्थेला मदतीसाठी कायम तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. माहेर संस्थेत अहोरात्र सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी केक कापून, अल्पपोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी श्री रमेश बोले श्रीमती मेघना हिवराळे आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीम. शितल हिवराळे यांनी तर सूत्रसंचालन कुमारी रजिया शेख हिने केले.