(रत्नागिरी/प्रतिनिधी)
‘असनी’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असून त्याचा मासेमारीवर परिणाम झाला आहे. मोजक्याच नौका मासेमारीसाठी जात असल्याने मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो सुरमईसाठी नागरिकांना नऊशे रुपये मोजावे लागत आहेत. वादळाचा परिणाम अजून दोन राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असनी चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे खोल समुद्रातील वातावरण बिघडले असून उंचच उंच लाटा निर्माण होत आहे. परिणामी मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे टाळले आहे. गेले दोन दिवस ही परिस्थिती उद्वलेली आहे. अरबी समुद्रातही त्या वादळाचा प्रभाव जाणवत असून पाण्याला मोठा करंट मारत आहे.
हवामान विभागाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्या नुसार अनेक मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीला जाणे टाळले. त्यामुळे मिरकरवाड्यासह छोट्या-मोठ्या बंदरांवर मासळीची आवक घटलेली आहे. मिरकरवाडा येथे दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते.
गेल्या दोन दिवसात मासळीच कमी असल्याने दरही वधारले आहेत. सुरमई, पापलेट, सरंगा, बांगडे या मासळीसह अन्य प्रकारच्या मासळीचे दरही वाढले असल्याने खवय्यांचा हिरमोड झाला आहे. सध्या एक किलो सुरमई 600 रुपयांवरुन 900 रुपयांवर गेली आहे. 900 रुपये किलो पापलेट 1200 ते 1500 रुपयांनी मिळत आहे. शंभर रुपयांमध्ये मिळणार्या सहा बांगड्यांना 250 रुपये मोजावे लागत आहे.
अन्य मासळीच्या दरातही वाढ झाली आहे.त्यातच चाकरमानी गावी आले असून पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक मासळी घरी घेऊन जाण्यासाठी बंदरावर जात असतात. त्यांनाही दरवाढीचा फटका बसत आहे.
हजारो पर्यटक कोकणात उतरले असून हॉटेलमधील मासळी थाळीचे दर वधारल्याने त्याचा भुर्दंड बसत आहे. वादळ शमले असले तरीही पावसाळी वातावरण आणखीन दोन दिवस राहील असा अंदाज आहे. शनिवारनंतर मासेमारी पुन्हा जोरात सुरु होईल, असा विश्वास मच्छिमारांनी व्यक्त केला.