संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी गावात कोरोनाबाबत लसीकरण मोहिमेला बुधवार दि. 26 पासून सुरूवात करण्यात आली. ग्रामस्थांना धामापूर, देवरूख, पूर या ठिकाणी लस घेण्यासाठी आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब माळवाशी ग्रामपंचायतीने विचारात घेऊन गावातच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
या लसीकरणाच्या शुभारंभावेळी सरपंच वैजयंती करंडे, उपसरपंच सुनील सावंत, आरोग्य विभागाच्या धामापूर उपकेंद्राच्या डॉ. वाजे, इंगळे, कुवळेकर, ग्रामसेविका समिधा मोहिते, शिक्षक अरविंद वारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिक्षक वर्ग, ग्राम कृती दलाचे सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कडू, आरोग्य सेविका धने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी लसीकरण केंद्राची मान्यता मिळणे आवश्यक होते. परंतु किचकट निकषांमुळे आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणास मर्यादा येत होत्या. तरीही कोरोना लसीकरणासाठी उपसरपंच सुनील सावंत यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. तालुका आरोग्य अधिकारी सोनावणे यांचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीच्या बैठकीत याबाबत ठरावही केला होता, अशी माहिती उपसरपंच सुनील सावंत यांनी दिली.
ग्रामस्थांनी लसीबाबत कोणताही गैरसमज न करता, अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी. ग्रामपंचायतीला व यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच वैजयंती करंडे यांनी केले आहे. उद्घाटनाच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद वारे यांनी केले.
लसीकरणासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्राम कृती दलाचे सदस्य गेले काही दिवस मेहनत घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बुधवारपासून लसीकरण सुरू झाल्याने ग्रामस्थ विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिलांनी आभार व्यक्त केले आहेत.
लसीकरणासाठी धामापूर उपकेंद्राचे अधिकारी, देवरूखचे आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे.