( अमित जाधव )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड शिक्षण संस्थेच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड येथे इयत्ता 10 वी च्या 35व्या व इयत्ता 12वी च्या 34व्या कै. सदानंद परकर अभ्यास शिबिराचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या शुभहस्ते झाला. या उदघाटनप्रसंगी संस्थेचे सचिव व शालेय प्रशासनाचे अभ्यासक विनायक राऊत, संस्थेचे खजिनदार संदीप कदम, संचालक विवेक परकर, निमंत्रित संचालक श्रीकांत मेहेंदळे आदी होते. प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक नितीन मोरे यांनी केले. सरस्वती पूजनाने शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना संस्था सचिव विनायक राऊत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, 10 दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सर्व क्षमता विकसित होतात. त्याच बरोबर चिकाटी, सातत्य व सराव यातून विद्यार्थी घडत असतो. एकूणच शिबिराची उपयुक्तता स्पष्ट केली. अनेक वर्षे हे अभ्यास शिबीर अविरत चालू आहे. शिबिरामध्ये कधीही खंड पडला नाही हे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बंधू मयेकर यांनी या कोरोना काळात सुद्धा संस्था अव्याहतपणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कायमच पाठीशी आहे व पुढेही कायमच राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात 10वी 12वी चे विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद सुर्वे यांनी केले.