(जाकादेवी /वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील वाचनालयातर्फे वाचनालयाच्या ९६ व्या वर्धापन दिनी तसेच भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध विषयावरील निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांसह अशा चार गटातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित रोख रक्कम व आकर्षक प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रीय व वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान आपल्या ओघवत्या शैलीत प्रमुख वक्ते आणि बळीराम परकर विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी उपस्थितांना देऊन वाचनाचे महत्व अधोरेखित केले.या प्रसंगी मालगुंड शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर, सचिव विनायक राऊत, मालगुंड वाचनालयाचे अध्यक्ष रोहित मयेकर, वाचनालयाचे कोषाध्यक्ष किशोर पाटील, सहसचिव नंदकुमार यादव, नंदकुमार साळवी ,प्रमुख व्याख्याते मुख्याध्यापक बिपीन परकर, मुख्याध्यापक नामदेव वाघमारे, मुख्याध्यापक आशिष घाग , प्रदिप मेस्त्री, प्राथमिक शाळा केंद्र मुख्याध्यापक संतोष शिरकर यांसह परिसरातील विजेते स्पर्धक, मार्गदर्शक शिक्षक, परीक्षक, विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
मालगुंड जाकादेवी,चाफे, काजुर्ली तसेच परिसरातील प्राथमिक शाळांतील सुमारे ७० स्पर्धकांनी या निबंध स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला होता. या स्पर्धकातून अनुक्रमे तीन क्रमांकाला रोख रक्कम व आकर्षक प्रमाणपत्र देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.