(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठेतील केळकर दुकान ते हॉटेल स्वाद पर्यंत असलेले गटार गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या पाण्याने व कचऱ्याच्या ढिगाने तुंबले होते. त्यामुळे या गटाराची साफसफाई करण्याच्या उद्देशाने मालगुंड बाजारपेठेतील स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थ यांनी शिवसेना ( शिंदे) गटाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन तथा आबा पाटील यांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर त्यांनी ताबडतोब या गटाराची तातडीने साफसफाई करण्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांकडे गटार साफसफाईची मागणी लावून धरली. त्यानुसार रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमृत पवळ यांनी तातडीने शिवसेना ( शिंदे गट) विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन तथा आबा पाटील यांच्या सूचनेची दखल घेऊन आपले कर्मचारी मालगुंड बाजारपेठेमध्ये पाठवून गटाराची पूर्ण साफसफाई करून घेण्याचे काम केले. त्यामुळे आता गटारातील संपूर्ण तुंबलेले पाणी आणि साचलेला कचरा मोकळा झाल्याने गटारामधून सुस्थितीत पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.
या गटारातील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या कामी मालगुंड येथील हॉटेल समाधानचे मालक भूषण मेहेंदळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी त्यांनी आपला स्वतःचा टेम्पो देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना विनामूल्य मदत केली. एकूणच,मालगुंड बाजारपेठेतील गटाराच्या साफसफाईचे काम शिवसेना (शिंदे गट) विधानसभा क्षेत्रअध्यक्ष गजानन तथा आबा पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याने तसेच संबंधित काम तातडीने करून देण्यासाठी आपली तत्परता दाखविणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमृत पलव यांचेसह संबंधित बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य करणारे मालगुंडचे हॉटेल व्यावसायिक भूषण मेहेंदळे या सर्वांचे मालगुंड परिसरातून विशेष कौतुक होत आहे. त्याचबरोबर मुख्य बाजारपेठेतील गटाराची साफसफाई करण्यात आल्याने परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.