(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा मालगुंड तळेपाट नंबर दोन मध्ये नवागातांचे व नवीन शिक्षकांचे स्वागत मोठ्या जल्लोषात व उत्साहात करण्यात आले. यावेळी प्रवेशोत्सव व नवागातांचे स्वागत कार्यक्रमाच्या सुरुवातीला मालगुंड तळेपाट परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये विविध घोषणा देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवागातांचे स्वागत औक्षण करून उपस्थित पालक महिला भगिनींच्या वतीने व शालेय शिक्षिकांच्या वतीने करण्यात आले. तसेच प्राथमिक शाळेत झालेल्या विशेष सभेमध्ये नवागतांचे गुलाब पुष्प व पेढा देऊन स्वागत करण्यात आले.
मुलांना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेत दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांबरोबर शाळेचे नवीन शिक्षक तथा मुख्याध्यापिका पूर्वा सावंत व उपशिक्षिका स्वरा चव्हाण यांचे यथोचित स्वागत उपस्थित पालक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्वा सावंत व उपशिक्षिका स्वरा चव्हाण यांचेसमवेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणाली कोलगे मालगुंडचे उपसरपंच संतोष चौगुले, ग्रामपंचायत सदस्या शिल्पा पवार, शाळेचे माजी शिक्षक संजय पवार, पत्रकार वैभव पवार माजी ग्रामपंचायत सदस्या अक्षता पवार, अंगणवाडी सेविका ज्योती पवार आदींसह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात सर्व शालेय विद्यार्थ्यांना पत्रकार वैभव पवार आणि शाळेचे माजी शिक्षक संजय पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांची प्रगती उंचावण्यासाठी व शाळेचा सर्वांगिण विकास होण्यासाठी शालेय शिक्षक व पालकांनी मेहनत घ्यावी असे आवाहन पत्रकार वैभव पवार व संजय पवार यांनी करून सर्व शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्वा सावंत यांनी ही आपल्या मनोगत विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास आणि शाळेची प्रगती होण्यासाठी सर्व पालक व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शैवटी सर्वांचे आभार उपशिक्षिका स्वरा चव्हाण यांनी मानले.