( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड तळेपाट येथील आदर्श प्राथमिक शाळा तळेपाट नंबर २ शाळेच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात सांस्कृतिक कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविधांगी बहारदार कार्यक्रमांना परिसरातील रसिक प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे औचित्य साधून विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या समारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून मालगुंडचे उपसरपंच संतोष चौगुले ग्रामपंचायत सदस्य शिल्पा पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणाली कोलगे, माजी अध्यक्ष राजेंद्र घाणेकर, शाळेचे माजी मुख्याध्यापक संजय पवार, रविकांत पवार गुरुजी दिवाकर पवार, शरद पवार, राजे माजी ग्रामपंचायत सदस्य रोहित साळवी,पत्रकार वैभव पवार, शाळेचे शिक्षक मारुती फड आदी मान्यवर, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात मालगुंडचे उपसरपंच संतोष चौघुले,विद्यमान ग्रा.पं.सदस्या शिल्पा पवार ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणाली कोलगे, शाळेचे माजी मुख्याध्यापक संजय पवार आदींचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला तसेच प्रमुख मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
तसेच शाळेच्या वतीने देण्यात येणाऱी गरजू महिला मदतीची रक्कम मालगुंड बौध्दवाडी येथील संगीता यशवंत पवार यांना देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमधील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेच्यावतीने सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या काही निवडक व्यक्तींचा सन्मान ही शाळेच्या वतीने करण्यात आला. या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे माजी मुख्यमंत्री संजय पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रेकॉर्ड डान्स, लावणी नृत्य, सामूहिक नृत्य, देशभक्तीपर गीते आदी लोककलेवर आधारित विविधांगी बहारदार कार्यक्रम सादर करून शालेय विद्यार्थ्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी आलेल्या रसिक प्रेक्षकांनी बक्षीसांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन मालगुंडचे पत्रकार वैभव पवार यांनी अतिशय उत्तम प्रकार केले. या शाळेची पटसंख्या कमी असताना देखील शाळेचे शिक्षक मारुती फड यांच्या विशेष प्रयत्नातून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याबद्दल सर्व पालक व ग्रामस्थांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालक व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.