रत्नागिरी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मालगुंड ग्रामपंचायतीने यंदा स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत जनजागृतीपर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामध्ये यंदा 15 ऑगस्ट च्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी मालगुंड ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर क्रियाशील सरपंच दीपक दुर्गवळी यांनी स्वतः ध्वजारोहण आपल्या हस्ते न करता मालगुंड गावातील बळीराम परकर विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेल्या शुभ समीर चव्हाण या विद्यार्थ्याला व इयत्ता बारावी कला शाखेत पहिली आलेली विद्यार्थिनी श्रुती संजय दुर्गवळी आणि वाणिज्य शाखेत प्रथम आलेली विद्यार्थिनी वैष्णवी किरण सावंत या तीन विद्यार्थ्यांना संयुक्तिकपणे देऊन एक वेगळा आदर्श विद्यार्थ्यांसमोर निर्माण केला आहे. हा ध्वजारोहण सोहळा पाहण्यासाठी मालगुंड गावातील सर्वच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली होती.
त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त मालगुंड ग्रामपंचायतीने मालगुंड गावातील सर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविधांगी देशभक्तीपर कार्यक्रमातून 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा जयजयकार करण्यात आला. त्यातच गेल्या आठ दिवसाच्या कालावधीत विविध जनजागृतीपर प्रबोधनात्मक कार्यक्रमांंचे अतिशय नेटके व प्रभावशाली नियोजन मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी आणि ग्रामविकास अधिकारी नाथाभाऊ पाटील यांनी करून स्वातंत्र्य महोत्सवाच्या निमित्ताने’ हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत मालगुंड गावातील प्रत्येकाच्या घरोघरी झेंड्यांचे वाटप करून ग्रामस्थांना राष्ट्रीय झेंड्याचे महत्त्व पटवून देऊन हा उपक्रम अतिशय यशस्वीरित्या राबिवला.
स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात गावातील विविध सामाजिक क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींचा आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी म्हणून काम करत असताना आपल्या प्रशासकीय कामात ठसा उमटविणाऱ्या विविध खात्याच्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान मालगुंड ग्रामपंचायतीने केला. तसेच ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सरपंच दीपक दुर्गवळी यांनी आपल्या ‘रियाराणी’ या मुलींच्या नावाने सुरू केलेल्या ‘कन्यारत्न प्रोत्साहनपर मानधन भेट’ या योजनेअंतर्गत आपल्या सरपंच पदाच्या शेवटच्या कारकीर्दीतील कन्यारत्न मानधन भेट गावातील कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातापित्यांना देऊन पुन्हा एकदा आपली कारकीर्द अधोरेखित केली आहे. याच कारणाने सरपंच दीपक दुर्गवळी यांनी आपल्या पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या सर्वच उल्लेखनीय कामांचा गौरव उपस्थित ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला यावेळी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश साळवी यांनीही आपल्या मनोगतातून सरपंच दीपक दुर्गवळी यांच्या कौतुकास्पद व प्रभावी कामगिरीचा उल्लेख करून उपस्थित ग्रामस्थांना स्वातंत्र्य अमृतमहोत्सवानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
सरपंच दीपक दुर्गुवळी यांनी आपल्या मनोगतामध्ये मालगुंड गावचा पहिला थेट सरपंच होण्याचा बहुमान हा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी यांच्यामुळे मिळाल्याचे आवर्जून नमूद करीत आपण पाच वर्षात केलेल्या कामांमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला मोलाचे असे सहकार्य केले त्या सर्वांचे ऋण व्यक्त करत अशाच प्रकारे मालगुंड ग्रामपंचायतीचा इतिहास कायम राखून सर्वत्र उंचावत असलेला मालगुंड गावचा नावलौकिक टिकवण्यासाठी सर्वतोपरीचे सहकार्य आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या क्षणापर्यंत करावे,असे आवाहन केले. या ७५ व्या ध्वजारोहण कार्यक्रमाला मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी यांचेसमवेत गणपतीपुळे- मालगुंड पोलीस दूरक्षेत्राच्या महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, पोलीस हवालदार राहुल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मधुकर सरगर,वंदना लाड, ग्रामविकासअधिकारी नाथाभाऊ पाटील, मालगुंडचे मंडळ अधिकारी सुरेंद्र कांबळे, रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश साळवी, शिवसेनेचे विभाग संघटक प्रकाश जाधव,सर्व ग्रा.पं. सदस्य, विलास राणे, पत्रकार वैभव पवार, मालगुंड विद्यालयाचे एनसीसी कमांडर उमेश केळकर, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, उपशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी आणि सर्व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, मालगुंड ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने केलेल्या विविधांगी कार्यक्रमांची वाहवा सर्वच ग्रामस्थांमधून व मालगुंड नजीकच्या परिसरातून होत आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !