(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मालगुंड ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 18 डिसेंबर रोजी होत असल्याने या निवडणुकीत खुल्या महिला आरक्षणामधून सरपंचपदाच्या थेट निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जय महाराष्ट्र पॅनलच्या उमेदवार तथा मालगुंड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच श्वेता खेऊर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज गुरुवारी १ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. त्यांचेसमवेत मालगुंड येथील जय महाराष्ट्र पॅनलच्या एकूण 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
मालगुंड येथील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सत्ता अबाधित आहे. रत्नागिरी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून मालगुंडमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी या निवडणुकीत देखील शिवसेनेने मोठी कंबर कसली आहे. या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी संपूर्ण शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे व उपतालुकाप्रमुख कोतवडे जिल्हा परिषद गट प्रकाश जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली देण्यात आली असून सर्व प्रमुख पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठी मेहनत घेत आहेत.
आज रत्नागिरी येथे शिवसेनेच्या सरपंचपदाच्या उमेदवार श्वेता खेऊर व सदस्यपदाचे सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी रत्नागिरी येथील सामाजिक न्यायभवनमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी त्यांचेसमवेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते कार्यकर्ते शेखर खेऊर, जगन सुर्वे, राजू साळवी, युवा अधिकारी रोहित साळवी आदींसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तत्पूर्वी शिवसेनेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दाखल बुधवारी मालगुंड येथे मालगुंड गावची ग्रामदेवता श्री चंडिका देवीच्या मंदिरात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिकांनी एकत्रित येऊन ग्रामदेवता चंडिका देवीला गाऱ्हाणे घालून सरपंच पदाच्या उमेदवार श्वेता खेऊर व सर्व सदस्य पदाचे उमेदवार विजयी होण्यासाठी चंडिका देवीचे आशीर्वाद कायम राहवेत अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी गावातील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे निश्चितच शिवसेनेची सत्ता अबाधित राखून आपला विजय निश्चित असल्याचे मत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. एकूणच मालगुंडमध्ये शिवसेनेच्या उमेदवार श्वेता खेऊर या माजी सरपंच असल्याने अतिशय अभ्यासू व एक सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसेच माजी सरपंच म्हणून काम करताना त्यांनी मालगुंडमध्ये आपले भरीव योगदान दिले होते या कामाची सर्वस्वी दखल घेऊन पुन्हा एकदा शिवसेना( ठाकरे गट) तालुका नेतृत्वाकडून त्यांना थेट सरपंच पदाची निवडणूक लढविण्याची संधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदाच्या नव्याने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या थेट सरपंच पदाची निवडणूक लढविणार असल्याने त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने आतुर झाले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय मालगुंडमध्ये निश्चित मानला जात असल्याने प्रतिस्पर्धी शिंदे व भाजप पॅनल गटात पॅनल मोठा भितीचा गोळा निर्माण झाला आहे. एकूणच मालगुंडमध्ये राजकीय रंगत आता शिगेला पोहचणार आहे.