( वैभव पवार/मालगुंड )
ग्रामपंचायतीच्या इतिहासात थेट सरपंच म्हणून सर्वप्रथम निवडून आलेल्या दीपक दुर्गवळी यांनी आपल्या सरपंचपदाच्या कारकीर्दीत विविध लोकोपयोगी विकासकामांना चालना देत असतानाच गावामध्ये विशेष उपक्रम राबवताना अनेक विधायक कामांवर भर देण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. याच विधायक कामांची संकल्पपूर्ती होत असतानाच नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या तहकूब ग्रामसभेचे आयोजन मालगुंड ग्रामपंचायतीच्या सभागृहात 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी 9 फेब्रुवारी 2022 हा दिवस सरपंच दीपक दुर्गवळी यांचा जन्मदिन असल्याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी नव्या संकल्पना आता ग्रामस्थांसमोर जाहीर केल्या आहेत.
तत्पूर्वी त्यांनी आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत स्वतःला मिळणारी सरपंच मानधनाची तीन हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या कुटुंबासाठी न वापरता गावातील कन्यारत्न प्राप्त झालेल्या कुटुंबाला देऊन त्या कन्येचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहनपर भेट म्हणून देण्याची योजना अखंडितपणे सुरू ठेवली आहे. आज बुधवारी 9 फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मालगुंड गावातील एकूण सहा कुटुंबांना त्यांनी आपली मानधनाची प्रोत्साहनपर भेट वाढदिवसाच्यानिमित्ताने झालेल्या ग्रामसभेमध्ये देऊन प्रोत्साहित केले.
आतापर्यंत एकूण 20 माता-पित्यांना त्यांनी कन्यारत्न प्रोत्साहनपर भेट देऊन सन्मानित केले आहे. गावातील कन्यारत्न प्राप्त कुटुंबाला ही प्रोत्साहनपर भेट देत असताना त्यांनी मुलगा हा वंशाचा दिवा ही जुनी अनिष्ठ प्रथा मोडीत काढण्यासाठी हा नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळे जनजागृतीचे काम त्यांच्याकडून होत असतानाच आता त्यांनी आजच्या ग्रामसभेमध्ये नवीन संकल्पना जाहीर करताना आपली कन्यारत्न प्रोत्साहनपर भेट सरपंचाच्या कारकिर्दीनंतरही तशाच प्रकारे पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या दोन कन्या रिया व सृष्टी ( राणी) यांचे संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामध्ये सरपंच कारकिर्द संपुष्टात आल्यानंतर सरपंच मानधन मिळणार नसल्याने स्वतः वैयक्तिक एक हजार रुपयांची कन्यारत्न प्रोत्साहनपर भेट देण्याचा मनोदय त्यांनी ग्रामस्थांना समोर व्यक्त केला आहे. तसेच आपल्या सरपंचपदाच्या शेवटच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीला चालना देता यावी, या मूळ उद्देशाने गावातील ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी ज्या ग्रामस्थांकडून 1एप्रिल ते 15 एप्रिल 2022या नवीन आर्थिक वर्षाच्या कालावधीत जे ग्रामस्थ आपले घरपट्टी वसुली रक्कम पूर्णपणे ग्रामपंचायतीकडे भरणा करतील त्या सर्व वसुली प्राप्त ग्रामस्थांच्या नावांची यादी करून मालगुंड ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये चिठ्ठीद्वारे कौल काढून एका ग्रामस्थांला यंदा एक मे दोन हजार बावीसच्या महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण दिनी राष्ट्रीय झेंड्याचे ध्वजारोहण करण्याचा सन्मान मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी स्वतः न करता संबंधित व्यक्तीला देण्याची संकल्पना जाहीर केली आहे.
त्याचबरोबर याच आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्याच्या कालावधीत ज्या ग्रामस्थांकडून घरपट्टी वसुली रक्कम पूर्ण भरणा केली जाईल त्या ग्रामस्थांना पुढील आर्थिक वर्षाच्या कालावधीत घरपट्टी भरणा करताना पाच टक्के रकमेची सूट देण्यात येईल. तसेच ज्या ग्रामस्थांकडून येणाऱ्या आर्थिक वर्षात भरणा केला जाणार नाही, त्या संबंधित ग्रामस्थांकडून दंडात्मक वसुली करण्यात येईल अशी देखील घोषणा त्यांनी केली आहे. जेणेकरून घरपट्टी वसुलीला चालना देऊन ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची आणि इतर बारिकसारिक कामांसाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्तता त्वरित करण्याच्या उद्देशाने सरपंच दीपक दुर्गवळी यांनी एक नवे पाऊल उचलले आहे. तसेच याच निमित्ताने त्यांनी नव्या संकल्पना जाहीर करताना गावातील मालगुंड हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी मध्ये सर्वप्रथम येणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आगामी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्याचा सन्मान संयुक्तरित्या देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एकूणच मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या या नव्या संकल्पना पाहून सर्वच ग्रामस्थांनी खूप मोठे आश्चर्य व्यक्त करून कौतुक केले आहे.
मालगुंड ग्रामपंचायतीच्या इतिहासात थेट सरपंच म्हणून पहिल्यांदा निवडून येण्याचा मान प्राप्त केल्यानंतर सरपंच दीपक दुर्गवळी यांनी आपली सरपंचपदाची कारकीर्द लोकोपयोगी विकासकामांबरोबरच विधायक उपक्रमांनी नव्याने काम करणाऱ्या होतकरू सदस्यांसाठी प्रोत्साहित करीत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. आजच्या विशेष ग्रामसभेच्या दिनी सरपंचांचा वाढदिवस ग्रामस्थांच्या उपस्थितीत मालगुंड ग्रामपंचायतीच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी व उपस्थित ग्रामस्थांकडून सरपंचांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच याच वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष ग्रामसभेत बोलताना बोलताना सरपंच दीपक दुर्गवळी यांनी आपल्याला ज्या प्रकारे ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे. तशाचप्रकारे कायमपणे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू दे अशी सदिच्छा व्यक्त केली, याच प्रेम आणि आशीर्वादाच्या जोरावर आपण अनेक विधायक कामे आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीनंतरही सातत्याने करत राहणार असल्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. एकूणच मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंचांची या नव्या संकल्पना पाहून मालगुंडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी सरपंचांनी नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपले ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी चंद्रकांत किंजळे यांना ध्वजारोहण करण्याचा सन्मान दिल्याबद्दल आणि गावातील कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातापित्यांना आपल्या सरपंच मानधनाची प्रोत्साहनपर भेट देत असल्याबद्दल अभिनंदनाचा घेण्याचें सुचित केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडूनही सर्वानुमते ठराव ग्रामसभेत मंजूर करून सरपंच दीपक दुर्गवळी यांच्या उल्लेखनीय कामगिरीची वाहवा करण्यात आली आहे. याप्रसंगी मालगुंड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी नाथा पाटील आदींसह विविध खात्यांचे कर्मचारी उपस्थित होते.