(रत्नागिरी)
चिऱ्याचे बांधकाम तोडत असताना विचारणा केल्याच्या रागातून शिवीगाळ, मारहाण व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फजल लतिफ गिरकर (रा. मैमुन्ना कॉम्प्लेक्स, राजापूरकर कॉलनी, रत्नागिरी) व अन्य दोन अनोळखी असे संशयित आहेत. सदर घटना मंगळवारी (ता. १२) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास राजापूरकर कॉलनी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीन अब्दुल सत्तार पडवेकर (वय ६४, रा. राजापूरकर कॉलनी, रत्नागिरी) यांच्या घराशेजारी असलेल्या त्यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये दोन अनोळखी व्यक्ती आल्या व त्यांनी बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. याबाबत विचारणा केली असता त्यांच्या अंगावर धावत जाऊन शिवीगाळ केली. त्यांनी आम्हाला फजल गिरकर यांनी पैसे देऊन तुम्हाला मारण्याचे व तुमच्या जागेचे कंपाऊंड पाडण्यासाठी पाठवले असल्याचे सांगितले. तसेच पुन्हा जागेत दिसलात तर तुला बघून घेईन, अशी धमकी दिली. या प्रकरणी शमीन पडवेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.