(चिपळूण)
सत्तार यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असे होणार नाही. सत्तार यांनी माफी मागितली तरी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष दिशा दाभोळकर केली आहे.
कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरून आता सर्वच स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सौ. दिशा दाभोळकर म्हणाल्या, आम्ही जिल्ह्याच्या वतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करतो. सत्तार यांनी माफी मागितली असली तरी, माफी काफी नाही. सत्तार यांनी राजीनामा दिला पाहिजे. म्हणजे पुन्हा कोणी महिलांच्या बाबतीत अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार नाही. राष्ट्रवादीने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. ही शिकवण आम्हाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी दिली आहे, असे सौ. दाभोळकर पुढे म्हणाल्या.