(संगमेश्वर/प्रतिनिधी)
कै. सुनील नारकर ट्रस्ट देवरुखच्यावतीने देण्यात येणारा विजयभाऊ नारकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीतील दीपक फेपडे यांना प्रदान करण्यात आला. कै. शांतामाई नारकर यांच्या स्मृतिदिनी देवरुख येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
विजय नारकर व कुटुंबियांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख्याने ग्रामीण भागातील अत्यावश्यक गरजांमध्ये फार मोठे काम केले आहे. पाण्याच्या अनेक योजना देणगीदार मिळवून पूर्ण केल्या आहेत. त्यांच्याच कार्यात खारीचा वाटा उचलून आपल्या गावात, दशक्रोशीत विजयभाऊंच्या विचाराने कार्य करणार्या दीपक फेपडे यांना यावर्षीचा हा बहुमान प्राप्त झाल्याचे ट्रस्ट अध्यक्षा श्रीमती स्नेहल नेने यांनी सांगितले.
दीपक फेपडे यांनी मानसकोंड फेपडेवाडी, देण येथे वैशिष्टयपूर्ण परसबाग व सामुदायिक शेतीद्वारे पाणी योजना, मांजरे कळकदेवाडी, आंबेड बु. शिगवणवाडी या पाणी योजना पूर्णत्वास नेण्यास मोलाची कामगिरी केली. शिवाय मानसकोंड येथील श्रीराम वाचनालयाचे ते संस्थापक अध्यक्ष म्हणून गेली 12 वर्षे काम पाहत आहेत. तसेच आपल्या गावात गावकर परिषदेचे आयोजन करुन समाजातील रुढी परंपरा दूर करण्यामध्ये पुढकार घेतला आहे. मुलीने पित्याच्या मृत्यूपश्चात अग्नी देणे, स्मशानभूमीत स्त्रियांची उपस्थिती असे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात ते अग्रभाुगी असतात. महावितरण कंपनीत प्रामाणिक सेवा केल्याने त्यांना रत्नागिरी विभागाचा गुणवंत कामगार पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
त्यांच्या या मार्गक्रमणात विजयभाऊ व शांतामाई नारकर यांचा आशीर्वाद व मोलाचे सहकार्य असल्याचे त्यांनी कार्यक्रमात आवर्जून सांगितले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रु. 5000 असे होते. त्यांना ही मिळालेली रक्कम आंबेडवाडी आंबेड बु. शिगवणवाडीच्या पाणी योजनेसाठी प्रदान केली. महावितरणची नोकरी सांभाळून सामाजिक बांधिलकी जपत विजयभाऊं चा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी वाढल्याचे मान्य करुन हे कार्य करण्यासाठी आई-वडील, पत्नी भाग्यश्री फेपडे व कुटुंबाची, ग्रामस्थांची अनमोल साथ लाभल्याचे ते मान्य करतात.
यावेळी व्यासपीठावर ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहल नेने, डॉ. सुरेश जोशी, सामाजिक कार्यकर्ते गजानन खातू, युयुत्सू आर्ते, मातृमंदिर सचिव आत्माराम मेस्त्री, दाते, विनय रानडे, प्रमोद संसारे, लाड, बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.