(पुणे)
पुण्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या एका नवजात अर्भकाला निर्दयी आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयातील संडासच्या भांड्यात कोंबून ठेवल्याची हृदय द्रावक घटना पुण्यातील सिंहगडरोड परिसरात घडली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे बाळाला वाचवण्यात यश मिळालं.
पुण्यातील सार्वजनिक महिला शौचालय समाज मंदिरामागे तुकाई नगर वडगाव इथं एका महिलेने नवजात अर्भकास जन्म देऊन संडासच्या भांड्यामध्ये कोंबून ठेवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवली.
माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संडासच्या भांड्यात कोंबलेले हे नवजात अर्भक रडत असल्याचे पाहिले. क्षणाचाही विलंब न करता नागरिकांच्या मदतीने हे चिमुकले बाळ संडासच्या भांड्यातून वरती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे बाहेर काढणे मुश्किल झाले होते. त्यातच रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्यांनी हाताला तेल लावून त्या बाळाला कसे बसे संडासच्या भांड्यातून मोठ्या मुश्किलीने बाहेर काढले. त्यानंतर तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून निर्दयी मातेला आणि नराधम प्रियकराला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.