( मुंबई )
चेंबूरमध्ये एका 17 वर्षीय मुलाची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईश्वर मारवाडी असं मृत मुलाचे नाव असून, आरोपी शफीक शेख याने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. मृत मुलगा मानलेली बहिण असूनही आपल्या पत्नी व मेहुणीसोबत लगट करीत असल्याच्या संशयातून आरोपीने मुलाच्या शरिराचे चार तुकडे करुन निर्घृण हत्या केली आणि शरिराचे तुकडे स्वतःच्या घरातच लपवून ठेवले. सदर प्रकरणी आरोपी शफीक शेखला आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी शफी उर्फ शफिक शेख (३३) याला अटक केली असून त्याच्या घरातून मृतदेहाचे तुकडे हस्तगत केले आहेत. ईश्वर मारवाडी (१७) असे मृत मुलाचे नाव असून शफी हा त्याच्या मानलेल्या बहिणीचा पती आहे. मानलेली बहीण असूनही ईश्वर पत्नी आणि मेहुणीसोबत लगट करीत असल्याच्या संशयातून शफीने ही हत्या केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. आरोपीने १७ वर्षीय मुलाची कोयत्याने वार करून हत्या केली व त्यानंतर मृतदेहाचे चार तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीत भरले. आरोपीने मुलाची हत्या करून त्याचे शीर व दोन हात-पाय वेगळं केले. आरोपीने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे पिशवीत भरून स्वयंपाक घरातच लपवून ठेवले होते.
या बाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी सकाळी ईश्वर हा शफीसोबत घरातून बाहेर पडला, मात्र घरी परतलाच नाही. त्यामुळे सासू रेश्मा आणि सासरे ललित पुत्रन यांनी शफी याच्याकडे ईश्वरबाबत विचारणा केली. त्यावर मंगळवारी सकाळी ईश्वर कुठे आहे ते सांगतो, असे शफी म्हणाला. त्याच्या वागणुकीमुळे रेश्मा आणि ललित यांना संशय आल्याने त्यांनी शफीच्या हालचालीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, बुधवारी पहाटे शफी घर बंद करून पत्नी आणि मुलासह गोवंडी येथे जात असल्याचे त्यांनी पाहिले. संशय बळावल्याने त्यांनी पुन्हा विचारणा केली असता शफी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे रेश्मा आणि ललित यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली.
आरसीएफ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि शफी याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सुरुवातीला उत्तरे टाळणाऱ्या शफीला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सर्व हकीकत कथन केली. ईश्वर याच्या गळ्यावर कोयत्याने वार करून हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून घरातच ठेवले असल्याचे त्याने सांगितले. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आणि पोलिसांसह सर्वांनी शफीचे घर गाठले. घरातील तीन बॅगांमध्ये ईश्वरच्या मृतदेहाचे तुकडे कोंबून ठेवण्यात आले होते. विल्हेवाट लावण्यास सोईचे व्हावे म्हणून तुकडे केल्याचे शफी याने सांगितले. दरम्यान, हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी शफीला अटक केली.