(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय वरवडे प्रशालेमध्ये दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.श्रीरंग कद्रेकर यांनी नुकतीच भेट दिली. पर्यावरण संस्था रत्नागिरी यांचे मार्फत रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये प्रबोधन वर्ग घेण्यात येतात त्यानिमित्ताने डॉक्टर कद्रेकर यांनी वरवडे शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या 95 वर्षांच्या वयात असताना सुध्दा विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधून तो अजूनही जपला असल्याचे दाखवून दिले. या सुसंवादात त्यांनी पर्यावरणाबद्दल खूप उपयुक्त अशी माहिती इयत्ता आठवी, नववी व दहावी च्या विद्यार्थी विद्यार्थिनींना दिली.
कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ, चिकू, मसाला पिकांची दर्जेदार कलमे उपलब्ध करून देणारे ‘लाल मातीत रंगलोय मी’ असे सांगणारे “कोसळणारे डोंगर झोपवण्यासाठी वृक्ष लागवडीचाच पर्याय आहे” असे सांगणाऱ्या डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांचे प्रशालेमध्ये सहाय्यक शिक्षक राजेश जाधव यांनी बुके देऊन यथोचित स्वागत केले. यावेळी त्यांचे बरोबर प्राध्यापक कुलकर्णी, डॉ.नागवेकर उपस्थित होते. या भेटीत शाळेतील छान वातावरण व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहता डॉक्टर कद्रेकर यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते.