(संगमेश्वर)
देवरूख येथील मातृमंदिरच्या २४ एकरच्या निसर्गरम्य फार्मवर दरवर्षी संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयाच्या देखील एकदिवसीय सहली येत असतात. जिल्ह्यातील सर्वात जास्त विद्यार्थीसंख्या असलेली शिवाजी विद्यामंदिर प्राथमिक कन्याशाळा देवरूख येथून ३५० विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य व पालक वनभोजनचा कार्यक्रम व फार्म भेट यासाठी एकदिवसीय सहल घेऊन आले होते.
प्राथमिक, माध्यमिक शाळा धम्माल सहल, वनभोजन अशा उद्देशाने तर महाविद्यालय शैक्षणिक सहल म्हणून फार्मवरील लागवड, नियोजन, विक्री इत्यादी समजून घेण्यासाठी येतात. पावसाळ्यानंतर विद्यार्थी व युवकांसाठी निवासी शिबिरे सुरू झाली आहेत. सोबतच अशा शाळांच्या सहलीनी मातृमंदिर फार्म गजबजून जायला सुरुवात झाली.
संस्थेतील गोकुळची मुले-मुली, हॉस्पिटलमधील रुग्ण या सगळ्यांना चांगलं धान्य, दूध, फळं, भाजी अशा गोष्टी मिळाव्यात या उद्देशाने मातृमंदिरच्या संस्थापिका हळबे मावशी यांनी १९६८ ला ही ओझरे येथील २४ एकर जागा खरेदी केली होती. महाराष्ट्रभरातील युवकांनी येथे श्रमदान करून ही जमीन शेतीयोग्य बनवली, श्रमदानातूनच इथे विहिरी खोदल्या. अशा या जागेत बालगोपालांना बागडताना पाहून संस्थेसाठी झटणाऱ्या हातांना समाधान वाटत आहे.