[ रत्नागिरी / प्रतिनिधी ]
माझो शशी गेलो… काय नाय उरला… सगळा संपला… जगून काय करू… हा आक्रोश आहे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मातेचा. वारिशे यांच्या आई अंथरुणाला खिळल्या आहेत, आजारी आहेत. एकुलता एक मुलगा गेला. औषधोपचाराला पैसे नाहीत. त्यातच भेटायला येणाऱ्या, चौकशीला येणाऱ्या लोकांना काहीच सांगायचे नाही यासाठी प्रचंड दबाव असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता गावात राहायचे नाही, निघून जायचे इथून, असा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे समजत आहे.
भूमाफिया पंढरीनाथ आंबेरकर याने गाडीखाली चिरडून शशिकांत वारिशे यांची हत्या केली. वारिशे कुटुंब अद्याप त्या धक्क्यातून सावरलेले नाही. राजापूरच्या कशेळी गावात छोट्याशा घरात ते राहतात. दीर्घकालीन आजारपणामुळे वारिशे यांच्या आईला अंथरुणावरच पडून राहावे लागते. तिला अधूनमधून उपचारासाठी रत्नागिरीला न्यावे लागते. वारिशे हयात होते तेव्हा ते त्यांची काळजी घ्यायचे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आहे, परंतु तो अजून नोकरीला नसल्याने घराचा गाडा कसा चालवायचा, असा गहन प्रश्न कुटुंबासमोर आहे.
शशिकांत वारिशे यांची एक विवाहित बहीण आहे. वारिशे यांच्या हत्येनंतर तीच आईची काळजी घेत आहे. कशेळी हे खेडेगाव असल्याने तिथे आपात्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा नाहीत. त्यामुळे वारिशे यांच्या आईला दर दोन-चार दिवसांनी दवाखान्यात न्यावे लागत असल्याने तिला रत्नागिरी येथे मुलीच्या घरी ठेवायचे असे त्यांनी ठरवले आहे.
२५ लाखांतली फुटकी कवडीही अद्याप मिळाली नाही
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वारिशे कुटुंबाला सरकारच्या वतीने २५ लाखांची मदत जाहीर केली, परंतु त्यातील फुटकी कवडीही अद्याप मिळालेली नाही. वारिशे यांच्या मुलाला नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची प्रक्रियाही सुरू झालेली नाही.