(रत्नागिरी/प्रतिनिधी)
शहरातील राजीवडा नाका येथे पार्किंगच्या ठिकाणी उभी करुन ठेवलेली मोटारसायकल दुसरीकडे लावली याचा जाब विचारल्याने राग मनात धरुन मारहाण करण्यात आल्याची घटना 2 जून रोजी रात्री 10 वा. च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद मारहाण झालेल्या व्यक्तीची पत्नी फरहाना जमीर सोलकर यांनी येथील पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहाना यांचे पती जमीर सोलकर यांनी आपल्या दुचाकीवरुन मुलांना राजीवडा नाक्यावरुन फिरवून आणले आणि दुचाकी पार्किंगमध्ये लावून ठेवली. यावेळी शेजारी राहणार्या सैफअली सईद पावसकर याने सोलकर यांची गाडी दुसरीकडे लावून स्वतःची मोटरसायकल त्या ठिकाणी लावली. ‘माझी गाडी दुसरीकडे का लावलीस‘ असे सोलकर यांनी विचारले असता मनात राग धरुन सैफअली सईद पावसकर याने जागा तुझ्या बापाची आहे का म्हणत शिवीगाळ केली व हातातील कडे डोक्यात मारुन दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबतची फिर्याद फरहाना यांनी पोलीस स्थानकात दिल्यानंतर सैफअली सईद पावसकर याच्यावर भादविकलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहा. पोलीस फौजदार राठोड करत आहेत.