(मुंबई)
माझं वैर विठ्ठलाशी नाही, बडव्यांमुळे मी पक्ष सोडतोय, असे म्हणत ऊसतोड मजूर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम केला आहे. हा वंचित बहुजन आघाडीला एक मोठा धक्का मानला जात आहे. शिवराज बांगर यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता सक्रिय झाले आहेत. अशातच वंचितचे शिवराज बांगर यांची साथ आता मनसेला मिळाली आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत शिवराज बांगर यांनी जाहीर मनसेत प्रवेश केला आहे. बांगर यांनी मनसेत प्रवेश केल्याने बीडमध्ये मनसेची ताकद वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
पक्षातील अनेक जण त्रास देत आहेत. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे. माझं वैर विठ्ठलाशी नाही. मात्र, मी पक्षातील बडव्यांमुळे त्रस्त झालो आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवराज बांगर यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्यासह अनेकांनी त्रास दिल्याचा आरोप शिवराज बांगर यांनी केला.
त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, वर्षाताई जगदाळे, जिल्हाप्रमुख सुमंत धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, आदी उपस्थित होते.