एका विकृत प्रियकराने होम थिएटरमध्ये बॉम्ब ठेऊन माजी प्रेयसीच्या लग्नात भेट दिला. त्यानंतर याचा स्फोट झाल्याने माजी प्रेयसीच्या पतीसह दोन लोकांचा जीव गेला आहे. ही घटना छत्तीसगड मधील कबीरधाम जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी मंगळवारी या घटनेची माहिती देताना सांगितले की, या स्फोटात दोघांचा मृत्यू तर अन्य चार लोक जखमी झाले आहेत. लग्नात आरोपीने ही म्यूझिक सिस्टिम भेट स्वरुपात दिली होती. नवविवाहित २२ वर्षीय हेमेंद्र मेरावी याने म्यूझिक सिस्टमचे स्विच ऑन केल्यानंतर म्यूझिक सिस्टमचा स्फोट झाला. ज्या खोलीत या होम थिएटरचा स्फोट झाला त्या खोलीच्या भिंतींना व छताला चिरा पडल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मध्य प्रदेशमधून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
हेमेंद्र याचा विवाह अंजना गावातील एका मुलीशी झाला होता. सोमवारी हेमेंद्र आणि त्याच्या घरचे लोक लग्नात आलेल्या भेटवस्तू उघडून पाहात होते. यावेळी घरातील अन्य सदस्यही उपस्थित होते. जेव्हा हेमेंद्र याने होम थिएटर ऑन केला तेव्हा मोठा स्फोट झाला. यामध्ये हेमेंद्र याच्यासोबत त्याचा ३० वर्षीय मोठा भाऊ राजकुमारचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.