(मुंबई)
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी कोकण दौऱ्यावर असताना दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे सलग २५ वर्षे प्रतिनिधित्व केलेले ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊन ठाकरेंच्या दौऱ्याला अपशकून केला. दळवी यांचा भाजप प्रवेश हा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात दळवी यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. दळवी हे १९९० ते २०१४ असे सलग पाच टर्म दापोलीचे आमदार होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ साली शिवसेनेने दळवी यांच्याऐवजी योगेश कदम यांना संधी दिली होती. आता संजय कदम हे ठाकरे गटात असल्याने दळवी यांनी ठाकरेंना सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
गेली ४० वर्षे आपण शिवसेनेत होतो. आज भाजपमध्ये आलो आहे. पक्षवाढीसाठी जसे शिवसेनेसाठी काम केले तसेच काम भाजपसाठी आपण करू. २५ वर्षे आमदार असूनही उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. एका पराभवानंतर माझी अवस्था कचऱ्याच्या टोपलीसारखी केली. त्यामुळे आजचा पक्षप्रवेश झाल्याचे दळवी म्हणाले. लवकरच दापोलीत भव्य मेळावा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले, तर अनेक पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. दरम्यान, यावेळी दापोलीतील शांताराम पवार, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश शिगवण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.