(खेड)
खेड येथील पंचायत समितीतील जलजीवन मिशनच्या बैठकीत झालेल्या वादविवादानंतर काठ्या व लोखंडी सळ्या घेऊन मारण्यासाठी धावून आल्याची तक्रार शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने येथील पोलीस स्थानकात नोंदवली आहे. त्यानुसार ठाकरे गटाच्या शिवसेनेतील माजी आमदार संजय कदम यांच्यासह २० ते २५ जणांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार येथील पंचायत समिती कार्यालयात जलजीवन मिशन अंतर्गत अधिकारी व ठेकेदार यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यास बसण्याची मुभा दिली जाणार नव्हती. मात्र तरीदेखील माजी आमदार संजय कदम व अन्य काही पदाधिकारी बैठकीस व्यासपीठावर उपस्थित होते. या बाबत विचारणा केल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद झाला.
या वादानंतर वाहनात बसण्यासाठी गेलो असता माजी आमदार संजय कदम यांनी गावातील व अन्य काहीजणांना मारण्यासाठी पाठवल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या दरम्यान त्या ठिकाणी दोन वाहनांतून आलेले २० ते २५जण काठ्या व लोखंडी सळ्या घेऊन मारण्यासाठी धावून आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार माजी आमदार कदम यांच्यासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.