(फुणगूस / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे सोमवार दि. १५ मे रोजी रत्नागिरी विधानसभेचे माजी आमदार श्री. बाळासाहेब माने यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातील अतिदुर्गम भाग असलेल्या निवईवाडी येथे सालाबादप्रमाणे श्री गांगेश्वर आणि श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि पारंपारिक नमनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी श्री. बाळासाहेब माने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले. वाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व श्री गांगेश्वर नवयुवक मित्रमंडळाचे मार्गदर्शक श्री. रामचंद्र गुणाजी धोपट यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बाळासाहेब म्हणाले, “विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. या दुर्गम भागातील रस्त्याची समस्या आपण लवकरच मार्गी लावत आहोत. याकामी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आपल्या वाडीतील तरुण उत्साही आणि हरहुन्नरी आहेत. आपल्या गावाचा विकास करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ग्रामस्थांनी योग्य साथ दिल्यास आपण मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करून हे चाकरमानी गावातच स्थायिक व्हावे यासाठी काम करू. मतदान कोणाला करावे हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. परंतू ते डोळसपणे करा तरच गावाचा विकास झपाट्याने होईल असा मला विश्वास वाटतो. आपण सर्वांनी अत्यंत प्रेमाने आणि आदराने देऊ केलेल्या या सन्मानाचा मी नम्रपणे स्विकार करतो. आणि भविष्यात आपल्या गावाच्या विकासात माझाही हातभार राहील असे अभिवचन देतो.”
यावेळी पूर्वसत्तेचे मानकरी श्री. अरविंद मुळे, सरपंच विश्वास घेवडे, ग्रा.पं. सदस्य श्री. प्रकाश गमरे, सौ. अंजली झगडे, श्री. जाधव गुरुजी, माजी ग्रा.पं. सदस्य गोविंद धोपट, श्री. जयराम घेवडे, गावातील अन्य प्रतिष्ठित मंडळी तसेच श्री गांगेश्वर नवयुवक मित्रमंडळ निवईवाडीचे मार्गदर्शक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.