(रत्नागिरी/प्रतिनिधी)
शहरातील मांडवी येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबियाला चक्क पाणीपुरी – भेळवाल्याने मारहाण करत चाकू दाखवून धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एक महिला व तिचा मुलगा जखमी झाला आहे. मुलगा प्रियांक सचीन जाधव ( वय १५ ) व सौ . प्रतिक्षा सचीन जाधव ( वय ३० ) अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल ५ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील मांडवी किनारी घडली .
मिळालेल्या माहितीनुसार सचीन जाधव ( वय ३९ , रा. नालासोपारा – मुंबई , मुळ ः काटवली देवरुख , ता . संगमेश्वर ) व त्यांची पत्नी मांडवी किनारी मुलांना घेऊन फिरण्यासाठी आली होती . त्यांच्यासोबत प्रियांक व यश निलेश जाधव, पियूष सचीन जाधव व क्षितीज अभिजित जाधव अशी मुले होती. सचीन जाधव हे मांडवी येथील रत्नागिरी गेट येथे फिरत असताना त्यांची पत्नी व मुलगा प्रियांक हे मांडवी येथे किनाऱ्यावरील पाणीपुरी खाण्यासाठी गेले होते. मुलांनी पाणीपुरी घेतल्यानंतर ती थोडी आंबट असल्याचे मुलांनी म्हटले. त्याचा राग मनात धरुन तेथील पाणीपुरी विक्रेत्या मुलांने प्रियांक याला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी सचीन यांची पत्नी प्रतिक्षा जाधव या सोडविण्यासाठी गेल्या असताना पाणीपुरी विक्रेत्याने सुरी काढून धाक दाखविला. हे प्रकरणी तेथेच थांबले नाही त्यानंतर पाणीपुरी विक्रेत्या मुलाच्या वडिलांनी येऊन प्रतिक्षा जाधव व प्रियांक जाधवला मारहाण केली. काहीतरी गोंधळ झाला असल्याचे लक्षात येताच सचीन जाधव तेथे आले व मारहाणीतून पत्नी व मुलाला बाहेर काढले. जखमीना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.