(रत्नागिरी)
रत्नागिरी शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी मांडवी बंदरात साचलेल्या गाळाची पत्तन विभाग, मेरीटाईम बोर्ड आणि मत्स्य खाते यांच्या अधिकाऱ्यानी यांत्रिक बोटीने जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छिमारांच्या नौका समुद्रात जाण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. हा मार्ग गाळाने भरला आहे. तसेच या मार्गात खडकही तयार झाल्याने मच्छिमारांसाठी धोका निर्माण झाला आहे. या गाळामुळे अनेक बोटींचे अपघात होऊन खलाशी दगावले आहेत, तसेच बोटींचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे हा गाळ उपसण्याची तसेच बंधारा घालण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून शासनाकडे सुरु आहे.
उद्योगमंत्र्याच्या सूचनेनंतर पत्तन विभाग, मेरीटाईम बोर्ड आणि मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमार संघर्ष समितीचे पदाधिकारी नजीर वाडकर, शफी वस्ता, इमान सोलकर, युसूफ भटकर, रहिम दलाल, रफीक फणसोपकर यांच्यासह मांडवीच्या मुखाशी साचलेल्या गाळाची बोटीवरून पाहणी केली. यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गाळाची माहिती दिली. त्यानुसार पाहणी करून अधिकाऱ्यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.