तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. हा तृणमूल काँग्रेसला मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे. तृणमूलचा लोकसभेतील एक खासदार कमी झाला आहे. तृणमूलच्या नेत्या महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. नीती समितीने टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांवर लोकसभेत अहवाल सादर केला. या अहवालात महुआ मोइत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती.
#WATCH | Mahua Moitra leaves from Parliament after her expulsion as TMC MP pic.twitter.com/MY8tZLsRTm
— ANI (@ANI) December 8, 2023
खासदार महुआ मोईत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. नीती समितीने गुरुवारी (8 डिसेंबर) लोकसभेत कॅश-फॉर-क्वेरी (पैसे घेऊन प्रश्न विचारले) प्रकरणात आपला अहवाल सादर केला. अहवालावर चर्चा झाल्यानंतर आवाजी मतदान पद्धतीने मतदान झाले. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. त्यानंतर हा अहवाल मंजूर करण्यात आला. आपल्या अहवालात नीती समितीने महुआवरील आरोप गंभीर असल्याचे नमूद करून कारवाईची मागणी केली होती. तसेच संसद सदस्यत्व रद्द करण्याची शिफारसही समितीने केलेली होती. अहवालावरील चर्चेदरम्यान, टीएमसी, काँग्रेस आणि इतर विरोधी खासदारांनी महुआ मोईत्रा यांना बोलण्याची संधी देण्याची मागणी केली. मात्र, भाजप खासदाराने या मागणीला विरोध केल्याने लोकसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली नाही.
महुआवर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप होता. महुआवर तिचा मित्र हिरानंदानीला संसदेची लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याचाही आरोप होता. नीती समितीने हे आरोप खरे असल्याचे म्हटले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, खासदार महुआ मोईत्रा यांचे वर्तन अनैतिक आणि खासदाराला अशोभनीय असल्याचा समितीचा निष्कर्ष हे सभागृह स्वीकारत आहे. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून कायम राहणे योग्य नाही.