(रत्नागिरी)
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. मात्र अचानक मृत्यू कसा झाला यावरुन नातेवाईकांनी रुग्णालयात जोरदार हंगामा केला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईकांनी केला. यावेळी डॉक्टरवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका घेतली होती. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्याने तणाव निवळला. प्रमिला प्रकाश शितप ( वय ४५, रा. फगरवठार, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
शितप या मंगळवार पासून रुग्णालयात उपचार घेत होत्या. अतिदक्षता विभागात दाखल असताना गुरुवारी (ता. ५) उपचारदरम्यान सायंकाळी प्रमिला हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले. यानंतर काही क्षणातच रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
शितप यांचा अचानक मृत्यू कसा काय झाला. काही तासापूर्वी त्या बोलत होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला सुचीत का केले नाही. असे प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केले. महिलेच्या मृत्यूनंतर तिचे नातेवाईक व फगरवठार येथील रहिवासी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यामुळे येथील वातावरण काहीकाळ तणावाचे झाले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. व पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली.