( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील महिलेच्या नावाने फेडरल बँकेचे क्रेडिट कार्ड बनवून 8 लाख 85 हजारांची फसवणूक केल्याची घटना 24 मार्च ते 14 जून या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी महिलेसह बँकेचीही फसवणूक केल्याची फिर्याद व्यवस्थापक सुमीत बागडिया (35, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली सचिन पाटील (रा. चिंचखरी, रत्नागिरी) यांचे मारुती मंदिर येथील फेडरल बँकेत खाते आहे. त्यांच्या खात्याला मोबाईल लिंक करण्यात आलेला आहे. त्यांच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक हा सध्या लातूर येथील अज्ञात व्यक्ती वापरत आहे. याद्वारे त्याने सायली पाटील यांच्या नावाचे क्रेडिट कार्ड लिंकद्वारे पत्ता पाठवून बदलून घेतले. त्याने स्वतःचा लातूर येथील अशोक हॉटेल, अमृता ट्रॅव्हल्स असा पत्ता केला. तसेच सायली पाटील याचे खाते असलेल्या फेडरल बँकेकडे मोबाईल लिंकद्वारे सायली यांच्या नावाचे क्रेडिट कार्ड बनवले. त्यानंतर त्याने वेळोवेळी 8 लाख 85 हजार इतकी रक्कम काढून फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.