(रत्नागिरी/प्रतिनिधी)
महिलेकडून मंगळसूत्र आणि सोन्याच्या बांगडया घेऊन 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक करणार्या तोतया पोलिसाच्या शहर पोलिसांनी बुधवारी मुसक्या आवळल्या. फसवणूकीची ही घटना 7 मे रोजी सायंकाळच्या सुमारास धन्वंतरी हॉस्पिटलजवळील फोम वॉश रॅम्पजवळ घडली होती.
शब्बीर जावेद जाफरी (34, मुळ रा.लोणी काळभोर हवेली, पूणे सध्या रा.परळी वैजनाथ,बीड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी 6 जून पर्यंत पोलिस कोठडीत केली. याबाबत श्रद्धा शिवाजी पावसकर (62,रा.आरोग्य मंदिर, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
त्यानुसार, शनिवारी 7 मे रोजी सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे आरोग्य मंदिर ते नरहर वसाहत अशा चालत जात होत्या. त्या धन्वंतरी हॉस्पिटलजवळील फोम वॉश रॅम्प येथे आल्या असता दोन अज्ञातांनी त्यांना पाठीमागून हाक मारली. आपण पोलीस असल्याचे सांगत त्यांनी श्रद्धा पावसकर यांच्याकडील मंगळसूत्र व सोन्याच्या 2 बांगडया घेऊन बदल्यात धातूच्या बांगड्या कागदात बांधून देत फसवणूक केली होती. याप्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून या तोतया पोलिसाला अटक केली.