(नाशिक)
जिल्ह्यातील ग्रामिण भागात सुरू असलेल्या हातभट्टी व्यावसायिकांचे उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्थापन केलेल्या ४ विशेष पथकातील महिला पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कामगिरी सिध्द केली आहे.या पथकाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३२ हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले.
या चार पथकांत ८ महिला अंमलदारांचा समावेश आहे. या सर्व पथकांचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे करत आहेत. या पथकाने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खेडभैरव,देवाचीवाडी, पिंपळगाव घाडगा, चिंचलेखैरे,देवळे आणि तळेगाव या दुर्गम भागांतील गावठी दारू हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले.याप्रकरणी ३३ संशयितांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास १२ लाख रुपयांचे हातभट्टी दारु, रसायन व साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.या महिला पथकाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण पोलिसांकडून धडक मोहीम सुरु असून अशा प्रकारे अवैध व्यवसाय आपल्या भागात सुरू असल्यास यासाठी पोलिसांकडून हेल्पलाईन नंबर देखील कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांना अवैध व्यवसायाविषयी काही माहिती असल्यास त्यांनी ती नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायास प्रतिबंध घालण्याकामी सुरू केलेल्या हेल्पलाईन क्रमांक 6262 256363 यावर देऊन सदर महिला अंमलदारांच्या कामगिरीस हातभार लावावा, असे आवाहन नाशिक पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.