(मुंबई)
‘कपाळाला टिकली नाही’ म्हणून बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा तात्काळ करा, अशी नोटीस महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना दिली आहे. महिला पत्रकाराला दिलेल्या या उत्तरामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे अडचणीत आले आहेत. याप्रकरणी संभाजी भिडे यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस देण्यात आली आहे.
संभाजी भिडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते. संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. मंत्रालयातून बाहेर आल्यानंतर महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचे कारण विचारले, पण संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराला उत्तर दिले नाही. पण या भेटीवर या महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले.
“तुम्ही टिकली लावली नसल्यामुळे आपण उत्तर देणार नसल्याचे” संभाजी भिडे म्हणाले. आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचे रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला दिली आणि ते निघून गेले. महिला पत्रकाराला दिलेल्या या उत्तरामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस देण्यात आली आहे.