( रत्नागिरी )
रत्नागिरीतील एका प्राण्यांच्या दवाखान्यात काम करणाऱ्या तरुणीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ अविनाश भागवत असे या डॉक्टरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २६ वर्षीय तरुणी ही डॉ. भागवत यांच्या शहरातील साळवी स्टॉप येथील दवाखान्यात कामाला होती. ३१ मार्च २०२२ रोजी दवाखान्यातील पैसे चोरल्याचा आरोप भागवत यांनी त्या तरुणीविरोधात केला होता. दरम्यान आपण पैसे चोरले नसल्याचे या पीडित तरुणीने डॉ. भागवत यांना सांगितले होते. दरम्यान पैसे परत केले नाहीस तर पोलिसांत केस दाखल करेन, अशी धमकी डॉ. भागवत यांनी या तरुणीला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच डॉ. भागवत यांनी आपल्याला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून आक्षेपार्ह वर्तन केले, असेही या तरुणीने शहर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी डॉ. भागवत याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.